Sunday, October 25, 2015

कोजागरी पौर्णिमा


आश्विन पौर्णिमा ही कोजागरी पौर्णिमा किंवा शरद पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते.यास 'माडी पौर्णिमा' असेही म्हणतात. ही शरद ऋतूतील आश्विन महिन्यात येते. इंग्रजी महिन्याप्रमाणे कोजागरी पौर्णिमा बहुधा ऑक्टोबरमध्ये असते. या दिवशी दूध आटवून त्यात केशर, पिस्ते, बदाम, चारोळ्या, वेलदोडे, जायफळ वगैरे गोष्टी घालून, तसेच साखर घालून, लक्ष्मीदेवीला नैवेद्य दाखविला जातो. दुधात मध्यरात्री पूर्ण चंद्राची किरणे पडू देतात आणि ते दूध मग प्राशन केले जाते. उत्तररात्रीपर्यंत जागरण केले जाते. अशी आख्यायिका सांगतात की उत्तररात्री साक्षात लक्ष्मीदेवी येऊन (संस्कृतमध्ये) 'को जागर्ति' (म्हणजे 'कोण जागत आहे') असे विचारते, म्हणून या दिवसाला 'कोजागरी पौर्णिमा' म्हणतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या सर्वात जवळ असतो. या दिवशी दम्यावरचे आयुर्वेदिक औषध घेण्याची पद्धत आहे. या दिवशी घेतलेले औषध लवकर लागू पडते असा समज आहे. कोजागरी पौर्णिमा गुजरातमध्ये रास व गरबा खेळून शरद पुनम नावाने साजरी केली जाते. बंगाली लोक याला लोख्खी पुजो म्हणतात व या दिवशी लक्ष्मीची पूजा करतात. मिथिलेमध्ये या रात्री कोजागरहा पूजा केली जाते. या दिवशी प्रत्येक कुटुंबातील ज्येष्ठ अपत्याला ओवाळून त्याची किंवा तिची 'आश्विनी' साजरी करतात. आश्विन महिन्यात मध्यरात्रीला असणाऱ्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा म्हणतात. तशी पौर्णिमा आली नाही तर दुसऱ्या दिवशीच्या पौर्णिमेला कोजागरी पौर्णिमा समजले जाते. ज्या दिवशी पौर्णिमा पूर्ण होत असेल त्या दिवशी नवान्न पौर्णिमा साजरी केली जाते. कोजागरी हा शब्द मराठीत, अनेकजण कोजागिरी असा उच्चारतात आणि लिहितात. मी पोस्ट करत असलेली माहिती विकिपीडियावरून शेअर केलेली आहे. हे मी जाहिरपणे नमूद करतोय.

No comments:

Post a Comment